Saturday 7 January 2017

ती सध्या काय करते...!

"ती सध्या काय करते" हा सिनेमा बघितला आणि मी सुद्धा अचानकपणे भूतकाळाला आठवून विचार करत बसलो की खरच ती सध्या काय करत असेल..?

ह्या जगात प्रत्येकाला काहीना काही भूतकाळ हा असतोच मग तो चांगला असो वा वाईट असो पण भूतकाळ हा असतोच, शक्यतो भूतकाळ हा नेहमीच चांगला असतो कारण मनुष्याच्या स्वभावगुणानुसार तो नेहमीच भूतकाळातील चांगल्या गोष्टीच आठवणीत जपवून ठेवतो..

तर असो सिनेमा बघितल्या वर मला पण अचानक माझा भूतकाळ माझ्या डोळ्या समोर आला.
आजपासून साधारणत: २३-२४ वर्षांपूर्वी चा काळ व आताच्या काळात फार फरक होता, त्या काळात मनातील भावना ह्या उत्कटपने प्रदर्शित करणे म्हणजे फार मोठे पराक्रम करण्या सारखेच होते, त्यामुळे किती तरी प्रेम कथा ह्या सुरु होण्याआधीच संपून जात. तेव्हा बाहेरील वातावरणाचा फार मोठा दबाव होता कदाचितते सर्व-सामान्य कुटुंबात असलेल्या घरगुती वातावरणामुळे तो थोडा जास्तीच वाढलेला असेल.

तो काळ म्हणजे मोबाईल, ईन्टरनेट, इमेल, फेसबुक चा बिलकुल नव्हता फार काय तर साधे टेलिफोन पण फार कमी लोकांकडे असायचे.
तेव्हा सर्वसामान्यपणे मुलांनी दिवसभर शाळेत अभ्यास करावा, संध्याकाळी बाहेर मैदानावर खेळून आल्या वर अभ्यास करावा व झोपावे; बस असाच दिनक्रम असायचा. लहान शहरात तर मुलांनी- मुलीशी बोलले किंवा मुली- मुलांशी बोलताना दिसणे म्हणजे रस्त्यावरील जनता सिनेमातील हिरो-हिरोईन बघतात तशी ऐकटक बघत रहायची, शेवटी कोणीही हाच विचार करायचा की 'नको बोलायला, उगीच घरी सांगितले कोणी काही तर?' 
तर अश्या कालखंडात बऱ्याच प्रेम कथा ह्या सुरु होन्या आधीच संपल्या..
फक्त मुलांच्या शाळेत शिकलेल्यांना तर न विचारले तरच बर..

तर असाच नेहमी शाळेत जाता-येताना मला पण "ती" नेहमी दिसायची, आमची फक्त नजरा-नजर व्हायची..
"ती" शाळेत माझी एक वर्ष जुनियर होती.
तिच्या डोळ्यातील भाव बघून तिच्या मनात काय चालू आहे याची निश्चित कल्पना यायची परंतु बोलण्याची हिम्मत काही व्हायची नाही;
मित्रांना सांगायचे तर खाली फुकट पब्लिसिटी ला वाव मिळणार होता, त्यामुळे कोणाला काही बोलण्याची सोय नव्हती.
"ती" सकाळच्या शाळेत व मी दुपारच्या शाळेत त्यामुळे दिवसभर कुठे दिसण्याची सोय नव्हती.
एक दिवस तिच्या मागे मागे जावून तिचे घर बघितले व बस खूप मोठे युद्ध जिंकल्याचा भास त्यावेळी झाला.

रोज एक-मेकांना बघायचे व मी वेळ मिळेल तसा तिच्या घर समोरून मुद्दाम चक्कर मारायचो, ती फक्त हसायची पण आम्हा दोघांची पण कधी बोलण्याची हिम्मत झाली नाही.

असे करत वर्ष निघून गेले, मी नववी चांगल्या मार्क्सनी पास होऊन दहावी ला गेलो;आतापेक्षा त्यावेळी दहावीला खूप महत्व होते; त्यामुळे नववीचा निकाल लागल्या बरोबर दहावीच्या क्लास लावण्याचे कार्यक्रम सुरु झाले.
.
निकालाच्या दिवशी मनात आले की आज "ती"च्याशी काही बोलू पण "ती" तिच्या वडीलांसोबत दिसली, आणि माझा निकाल बघून जेवढा आनंद झाला नाही त्या दिवशी तिला बघून झाला.
"ती" माझ्या जवळ येवून म्हणाली,'छान मार्क्स मिळालेत,आता दहावीला ह्या पेक्षाही चांगले मार्क्स मिळाले पाहिजे' आणि हसून निघून गेली..
ती जाताना पलटून बघितले आणि बाय केले 
मग तर भाऊ मला जग जिंकल्या सारखाच भास झाला ना..

इकडे घरी मला दहावीच्या क्लास साठी बाहेरगावी पाठविण्याचे ठरले व तशी व्यवस्था करून माझी रवानगी पण झाली..
गावी जाताना मनात "ती"चाच विचार येत होता, कारण ह्या उन्ह्याळ्याच्या सुट्टीत "ती"च्याशी बोलण्याचा आणि मैत्री करण्याचा विचार होता..
मग स्वतःच समजवून घेतले की घरी येवू त्यावेळी बोलू तिच्या सोबत..


मी परगावी पोचलो क्लासेस सुरु झालेत, अभ्यास सुरु झाला;
परंतु इकडे वडिलांची बदली झाल्यामुळे शहर सोडावे लागणार असे फोन वरून कळले, आणि त्या दिवशी मन खूप नाराज झाले कारण "ती" मला आता ह्यापुढे रोज दिसणार नव्हती, तिचे ते निरागस हसणे मला रोज दिसणार नव्हते;
घरी सांगितले की, 'मी माझ्या मित्रांना भेटलो नाही तेव्हा मी घरी आल्या नंतरच आपण शहर सोडून जाऊ, मला माझ्या मित्रांना भेटायचे आहे'

मी अभ्यासात दुर्लक्ष करू नये म्हणून कदाचित पण माझ्या मागेच शहर बदलले सुद्धा..

क्लास करून नवीन शहरात, नवीन घरात आलो परंतु मन मात्र अजूनही जुन्याच शाळेत कुठेतरी रमलेले जाणवत होते..
इच्छा होऊनही तिकडे जाता येत नव्हते, असे करून वर्ष संपले, दहावीला चांगले मार्क्स पडले, पुढे सायन्स ला गेलो नंतर अभ्यास/करियर/ नवीन मित्र ह्या घोळक्यात "ती" कुठेतरी विस्मरणात गेली.
पण बरेचदा "ती"ची आठवण ही यायचीच..

१०-१५ वर्षात बराच काळ बदलत गेला होता;
आता ईन्टरनेट, इमेल, ऑर्कुट चा वापर सुरु झाला होता, मी जुन्या बऱ्याच मित्रांना शोधले,
"ती"ची आठवण आली की सर्च करायचो पण ती काही सापडली नाही..

बऱ्याच वर्षानंतर असाच एक दिवस माझ्या जुन्या शाळेतील एक वर्गमित्र मला रेल्वेत भेटला, 
त्याची भेट झाल्यावर फार जुना एखादा खजिना सापडल्या प्रमाणेच झाले, सर्व जुन्या मित्रांची विचापूस करून 
झाली, मग "ती"च्या बद्दल विचारले तर कळले की दहावी नंतर ती पण शहर सोडून गेली;
मग तिची माहिती मिळेल अशी तिच्या मैत्रिणीची माहिती घेतली.
मनात आले की तिच्या मैत्रिणीकडून संपर्क मिळाला तर आज तर मनमोकळे बोलूच तिच्याशी..

त्याच वेळी तिच्या मैत्रिणीला विचारले, पण काही जास्त कळू शकले नाही,

आजच्या वर्चुअल जगात असा तर कोणालाच पटणार नाही की कुणाशी संपर्क होऊ शकलेला नाही म्हणून..

"ती" कुठे असेल ह्याच उत्तर मी अजूनही शोधतोय, मधे विसर पडला होता परंतु आता पुन्हा त्याची जाणीव झाली आहे, असा वाटत आहे की जखमेवरचे सालपट काढल्यामुळे जखम पुन्हा ओली झाली आहे व त्रास होतोय..

माझी ही जखम ओली झाल्यासारखी वाटत होती म्हणूनच ती येथे व्यक्त करण्याचे ठरवले.

"ती" कुठे आहे,कशी आहे, हे माहिती नाही; आजही तिचे निकालाच्या दिवशी शेवटच्या दिवशी झालेली (शेवटची) भेट मात्र माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील..


आयुष्याच्या  वळणावर कुठे भेट झाली तर निश्चितच तिच्याशी मनमोकळे बोलायचे आहे पण ह्या वेळी पण ते साधेल की नाही हे निश्चित नाही ..



"ती" पुढे आयुष्यात कधी भेटेल की नाही माहिती नाही पण "ती" मात्र कायम स्मरणात राहील...